लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे! लातूरच्या सुपुत्राने लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक भक्तिगीत गायन केलं आहे खुद्द बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी. हे गाणं १८ ऑगस्ट रोजी मुंबईतील वाशी येथे असलेल्या शंकर महादेवन यांच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं. या खास गाण्याच्या निर्मितीमागेही लातूरकरांचाच सहभाग आहे. या गाण्याचे निर्माते आहेत श्रीनिवास कुलकर्णी आणि अमोल घोडके, तर गीतकार आणि संगीतकार म्हणून शैलेश चंद्र लोखंडे यांनी हे भक्तिगीत साकारले आहे.
गाण्याचे वैशिष्ट्य: हे गाणं श्री गणेशजींवर आधारित एक भावपूर्ण भक्तिगीत असून, येत्या गणेशोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रात आणि गणेशभक्तांच्या मनात स्थान मिळवणार आहे. शंकर महादेवन यांनी गायनानंतर प्रतिक्रिया देताना, लातूरच्या सांगीतिक क्षमतेचं आणि स्थानिक कलाकारांच्या मेहनतीचं मनापासून कौतुक केलं. हे भक्तिगीत लवकरच आपल्या भेटीला येणार असून, भक्तीभावाने आणि सुरेल साजाने सजलेलं हे गीत गणेशभक्तांसाठी एक अद्वितीय भेट ठरणार आहे.

