शेतक-यांचे आंदोलन, शासन निर्णयाची केली होळी
नांदेड/हिंगोली
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने हा प्रकल्प राबवण्यासाठी तब्बल २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता हा महामार्ग ज्या-ज्या जिल्ह्यांतून जात आहे, त्या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. परभणी, बीड, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले असून, नांदेडमध्ये शेतक-यांनी या महामार्गाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. लातूरमधूनही शेतक-यांचा विरोध आहे.
नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतक-यांनी एकत्रित येऊन बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट, आमच्या लेकरा बाळांना ड्रीम नाहीत का, यावेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतक-यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जमिनीची मोजणी करायला आलेल्या अधिका-यांना मारू नाही तर मरू असा आक्रमक पवित्रा शेतक-यांनी घेतला. या अगोदर मंगळवारी बीड जिल्ह्यातही शेतक-यांनी या शक्तिपीठाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिका-यांना रोखले. त्यामुळे हा वाद चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे.
महामार्गाच्या विरोधात शेतक-यांमध्ये प्रचंड रोष असून, आज (२५ जून) रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गबाधित शेतक-यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. बैठकीनंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयाची होळी केली. आमची वडिलोपार्जित जमीन जात असेल तर आम्हाला हा शक्तिपीठ मार्ग काय कामाचा, असा सवाल शेतक-यांनी उपस्थित केला आहे.
एक इंचही जमीन देणार नाही
शक्तिपीठ महामार्गाला आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असा निर्धार यावेळी शेतक-यांनी बोलून दाखविला. तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी करून या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला.
शेतक-यांना विश्वासात
न घेता सरकारचा निर्णय
गेली १४ महिने आम्ही आंदोलन केले. निवेदन दिले. मुंबईला जाऊन धरणे धरली. तरीदेखील शासनाने आमची कुठलीही दखल घेतली नाही. राज्यपालाच्या अभिभाषणात शेतक-यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काहीही करणार नाही, अशी ग्वाही दिली. परंतु प्रत्यक्षात शेतक-यांना न विचारता शासन आदेश काढण्यात आला. तुम्ही एकतर्फी निर्णय घेत असाल तर आमचे दुसरे महायुद्ध सुरू झाले आहे, अशा शब्दांत शेतक-यांनी इशारा दिला.