रेणापूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील मोरवड तसेच रेणापूर, औसा तालुक्यातील कवठा केज, नाहोली, भेटा, अंधोरायासह अन्य गावांमध्ये प्रशासनाकडून शेतक-यांच्या जमिनीची मोजणी जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार रेणापूर तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे व शिष्टमंडळाने रेणापूर तहसीलदार यांची भेट घेवून निवेदन देवून शेतक-यांना नाहक त्रास देव ूनये, अशी मागणी केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या काळात थांबलेली ही प्रक्रिया निवडणुका संपताच अचानक वेगाने सुरू करण्यात आली असून त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र संताप व अस्वस्थता निर्माण झाली आहे. शक्तिपीठ महामार्गबाधित संघर्ष समितीतील गजेंद्र येळकर, बालाजी हाके पाटील, दिलीप कुलकर्णी, विजय कुलकर्णी व इतर कार्यकर्त्यांना रेणापूर पोलीस ठाण्यामार्फत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सोबतच विविध गावांतील शेतक-यांनादेखील नोटिसा पाठवून दबाव टाकण्यात येत आहे. कोणतीही सविस्तर चर्चा, योग्य मोबदल्याची हमी, लेखी आश्वासन किंवा पारदर्शक प्रक्रिया न राबविता मोजणी लादली जात असल्याची बाब गंभीर आहे.
शेतक-यांवरील जबरदस्तीची मोजणी व पोलिसी कारवाई तात्काळ थांबवावी. संबंधित गावांमध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्यात खुली व पारदर्शक चर्चा आयोजित करावी. शेतक-यांवरील प्रतिबंधात्मक नोटिसांचा पुनर्विचार करून अन्यायकारक कारवाई मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाकडून केले जाईल, असे रेणापूर तालूका काँग्रेस कमिटीकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गोविंद पवार, शहर अध्यक्ष पदम पाटील, माने केशव, प्रकाश पाटील, उमाकांत खलंग्रे सभापती लतीफ शेख, रमेश शिंदे, सचिन इंगळे, संतोष शिंदे,बालाजी हाके, किरण पवार, अॅड. तानाजी कणसे, दिनेश पाटील, चंद्रकांत कातळे, सचिन मोटेगावकर, अॅड मुरलीधर पडोळे, मुकुंद सूर्यवंशी, दिग्विजय पाटील, प्रदीप काळे, आब्रिश भिसे, ज्ञानेश्वर कुसुंबे,राजकुमार कांबळे, राहुल पाटील, अॅड शिरगिरे, बिभीषण कदम, कल्याण शाहीर, दीपक जगदाळे आदींची उपस्थिती होती.

