लातूर : एजाज शेख
शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने २० हजार कोटी रुपयांची तरतुद करुन महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर व औसा या तीन तालुक्यांतील २२ गावांमधून हा महामार्ग जात आहे. त्यासाठी सरकारला ४६८ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आह. आज दि. १ जुलै आजच कृषी दिन आहे. आजपासूनच महामार्गाच्या जमीन मोजणीस प्रारंभ होणार आहे. म्हणजे कृषीदिनीच शेतक-यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा कार्यक्रम सरकारने आखला आहे.
वर्धा जिल्ह्यातील पवनार येथुन सुरु होणारा हा महामार्ग तेथून नागपुरला जोडला जाणार आहे. हा महामार्ग वर्धा, नागपूर, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून पत्रादेवीपर्यं (उत्तर गोवा) जाणार आहे. तीन शक्तीपीठातून हा महामार्ग जात असल्याने त्याला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. तो ८०२ किलोमीटरचा असणार आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापुर व औसा या तीन तालुक्यांतील २२ गावांमधून हा महामार्ग जाणार असल्यामुळे त्यासाठी ४६८ हेक्टर जमीन भूसंपादन करावी लागणार असून त्याकरीता आज दि. १ जुलैपासून जमीन मोजणीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आज लातूर तालुक्यातील ढोकी, ४ जुलै रोजी कासार जवळा, ८ जुलै रोजी चाटा, १५ जुलै रोजी भोयरा, १६ जुलै रोजी काटगाव, १७ जुलै रोजी गांजूर, २२ जुलै रोजी रामेश्वर व बोपला, २३ जुलै रोजी मांजरी, २८ जुलै रोजी चिंचोली (ब.), २९ जुलै रोजी दिंडेगाव, ४ ऑगस्ट रोजी गातेगाव, ७ ऑगस्ट रोजी मुरुड-अकोला येथील जमीनी मोजल्या जाणार असून रेणापूर व औसा तालुक्यातील जमीनी मोजण्याच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील २२ गावांमधून ५५७ गटांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. याकरीता ४६८ हेक्टर जमीन सरकारला संपादीत करावी लागणार आहे. यास शेतक-यांचा विरोध आहे. यातून सरकारकडे आतापर्यंत ६८१ आक्षेप आलेले आहेत. हा महामार्ग नको, मोबदला वाढवून द्यावा, अशा प्रकारचे आक्षेप आहेत.