25.3 C
Latur
Saturday, November 8, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची यंदा दिवाळी नाही

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची यंदा दिवाळी नाही

अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे नुकसान झाल्याने निर्णय
बारामती : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे नुकसान झाले असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून राज्यात यंदा दिवाळी साजरी करण्यात येणार नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज जाहीर केले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतक-यांना आवश्यक ती मदत केली नसल्याची खंतही पवार यांनी बोलून दाखविली.

बारामतीत गोविंद बाग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या सहका-यांशी चर्चा करून पक्षाकडून यंदा दिवाळी साजरी करायची नसल्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी अस्वस्थ असून, दिवाळी साजरी करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे पक्षाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून शेतक-यांना आवश्यक ती मदत करण्यात आलेली नाही. या प्रकरणात राजकारण आणले जात आहे. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. मात्र, ज्यांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे, त्यांनी शेतक-यांना दिलासा देणे आवश्यक आहे. राज्य सरकारने केलेली मदत कमी आहे. त्यातून कुठलेही नुकसान भरून येऊ शकत नाही, अशी टीकाही पवार यांनी केली.

राज्याची आणि देशाची सत्ता असणा-यांवर लोकांना संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी असते. नुकसानीचे स्वरूप बघितल्यास राज्य सरकारने जाहीर केलेल्या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल, असे वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर संकटग्रस्त शेतकरी नाराज आहे. हे जे काही घडतंय ते दु:खद आहे, असे शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR