मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुका आता काहीच महिन्यांच्या अंतरावर आल्या आहेत. त्या निवडणुकांमुळेच शरद पवार यांना आता छत्रपती शिवाजी महाराज तसेच लालबागच्या राजाची आठवण आली आहे. मात्र त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे हे निव्वळ ढोंग आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सोमवारी सकाळी शरद पवार हे त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनला गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. मात्र त्यांच्या याच कृतीनंतर प्रवीण दरेकरांनी पवार यांच्यावर कडाडून टीका केली.
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडीओद्वारे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘४० वर्षांनंतर (मध्यंतरी) शरद पवार रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. आणि आता ३० वर्षांनी पुन्हा त्यांनी जाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता पवार साहेबांना रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण आली. मी लालबागच्या राजाकडे प्रार्थना करतो, की त्यांना हिंदुत्वाबाबतीत सुबुद्धी मिळो,’ असे दरेकर म्हणाले..