24.6 C
Latur
Tuesday, June 24, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवार अन् अजित पवार पुन्हा एकत्र?

शरद पवार अन् अजित पवार पुन्हा एकत्र?

बंद दाराआड झाली चर्चा

पुणे : प्रतिनिधी
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एआय आधारित साखर प्रकल्पावरील उच्चस्तरीय बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीत ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या वापरावर सखोल चर्चा झाली. पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवीन राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा असल्याने, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचीच मात्र जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर होती.

या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात,हर्षवर्धन पाटील यांच्यासह वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी तसेच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत एआय वापराबाबत चर्चा झाली. या तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊस उत्पादन वाढीबाबबत प्रयत्न केले जाणार आहेत.

मात्र या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे ए आय चा वापर करणा-या संस्थेला केवळ त्यावेळीच निधी दिला जाईल, जेव्हा प्रकल्पामुळे ऊस उत्पादनात किमान ४० टक्के वाढ झालेली दिसून येईल. दरम्यान यामुळे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन शक्य होणार आहे, असं बैठकीत सांगण्यात आलं. तर या प्रकल्पांतर्गत बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती अर्बन बँक आणि आंतरराष्ट्रीय ए आय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक पायलट प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने ए आय चा वापर करून ऊसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

पवार कुटुंबिय एकत्र येण्यावर अनेकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पवार अनेकदा एकत्र आले आहेत. यावर अजित पवार यांनी आम्ही दोघे अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी आहोत, विकास कामांकरिता एकत्र बैठकीत भेटत असतो असे सांगितले आहे. पण त्यांच्या एकत्रित उपस्थितीने दोघांमध्ये नव्याने संवाद सुरू होतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान, राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीला औद्योगिकदृष्ट्या जितकं महत्त्व आहे, तितकंच ती राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे.
……..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR