मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यात काळजीचे
कोणतेही कारण नसून, ते केवळ नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले आहेत.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नाही. त्यांच्या नियमित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांनी प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करू नये, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी एप्रिल महिन्यातदेखील शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार दिल्लीहून आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना अॅडमिट करण्यात आले. दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार होता मात्र डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले होते. यावेळी देखील रुटीन चेकअपमुळे शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
















