लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या विभागाची उच्चस्तरीय अधिका-यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात संदर्भाने ‘एकमत’ने वृत्त मालिका सुरु केलेली आहे. त्याची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी दि. २ एप्रिल रोजी महापालिकेत अधिका-यांची बैठक घेत रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्वे करुन ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे टाऊन प्लॅनिंग विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर जयश्री सोनकांबळे व आयुक्त श्रीमती मानसी मीना यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीस उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अमोल लांडगे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, क्षेत्रीय अधिकारी रवी कांबळे, संतोष लाडलापुरे, समाधान सूर्यवंशी, विजय राजुरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, धोंडीबा सोनवणे, शिवराज शिंदे, अक्रम शेख यांच्यासह सर्व १८ प्रभागांचे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
महानगरपालिकेतील नगरविकास विभागाच्या अधिका-यांनी बनावट ले-आऊटच्या आधारे शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब केले आहेत. हे ११० सर्व्हिस रोड आणि सर्व्हिस रोडची कनेक्टिव्हिटी कायम केली तर सुमारे १० किलो मीटरचे रस्ते मोकळे होणार आहेत. या संबंधीचे रेकॉर्ड असतील तर किमान १० संचिका द्याव्यात, या गायब झालेल्या ११० सर्व्हिस रोडची माहिती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बालाजी जाधव व काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील बसपूरे यांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या टाऊन प्लॅनिंग विभागाकडे २ महिन्यापुर्वी केलेली होती.
हा विषय ‘एकमत’ने लावून धरला आहे. त्याची दखल घेत महापौर जयश्री सोनकांबळे व मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी बैठक घेत याचे सर्वे करण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत.

