लातूर : प्रतिनिधी
शहरातील ओंकार प्रतिष्ठान व अष्टविनायक प्रतिष्ठान संचलित बुद्ध गार्डन येथील भव्य बुद्ध मूर्ती आणि बोधगया येथील पवित्र बोधी वृक्षाची जोपासना यामुळे हे ठिकाण आधीच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या वेगळे स्थान निर्माण करून आहे. आता याच पवित्र स्थळाने आरोग्य आणि फिटनेसच्या क्षेत्रातही एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने येथे एक अनोखा विक्रम घडला असून, परिसरातील चित्रकला शिक्षिका मोहिनी दीपरत्न निलंगेकर यांनी स्वत:च्या जिद्दीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाने दोन वर्षांत तब्बल दहा किलो वजन कमी करत थायरॉईडवर नियंत्रण मिळवले आहे. त्यांच्या या परिवर्तनामागे नियमित योग, सूर्यनमस्कार आणि झुंबा यांचा मोठा वाटा आहे.
लातूरमधील फिटनेस वर्ल्ड स्टुडिओ प्रीती मिसर यांच्या झुंबा प्रशिक्षणासोबतच मोहिनी यांनी स्वत:चा ‘तुलसी फिटनेस’ हा उपक्रम सुरू केला. पहाटे ५ वाजता सुरू झालेल्या या मोफत क्लासला सुरुवातीला काही महिला उपस्थित राहू लागल्या, पण पाहता पाहता ३५ ते ५० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. बुद्ध गार्डनमधील बुद्धगया महिला मंडळाच्या वंदना आणि ध्यान उपक्रमांनीही याला सकारात्मक दिशा दिली. या उपक्रमाची दखल घेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी यांनी पुढाकार घेत योगाचार्य विष्णू भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला मोहिनी निलंगेकर यांनी सक्रिय सहकार्य केले, तर अंतिम दिवशी प्रीती मिसर यांनी झुंबाचे प्रभावी मार्गदर्शन केले.
समारोप सोहळ्यात लातूर अर्बन बँकेचे चेअरमन आकाश राठी, संचालिका शुभदा रेड्डी आणि अभय शहा यांच्या उपस्थितीत सर्व योग शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी योगाचार्य भुतडा यांनी योग आणि प्राणायामाचे महत्त्व विशद करत, ‘नियमित योग हा केवळ शरीरासाठी नव्हे, तर मन आणि आत्म्याच्या संतुलनासाठी अत्यावश्यक आहे,’ असे सांगितले. त्यांनी यांच्या योग चळवळीचा उल्लेख करत योगाची जागतिक पातळीवरील वाढती स्वीकारार्हता अधोरेखित केली. बुद्ध गार्डनमधून सुरू झालेली ही आरोग्य चळवळ केवळ लातूरपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

