22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeलातूरशहरातील २५० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले

शहरातील २५० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील देशपांडे गल्ली नजीकच्या भागात असणारे २५० वर्षांपूर्वीचे वडाचे झाड दि. १२ जून रोजी उन्मळून पडले असून तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मनपाच्या वतीने आवश्यक त्या  उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन तहसीलदार यांना त्यांनी संपर्क  साधत महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्याची विनंती केली.
लातूर जिल्हा आणि शहरावर मागील महिनाभरापासून पावसाने जोर धरला आहे तसेच वेगाचे वारे वाहत असल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. अशातच लातूर शहरातील देशपांडे गल्ली नजीकच्या भागातील २५० वर्षाचे वडाचे झाड आज उन्मळून पडल्याने संजीवनी महावीर देशमुख, अनिता धनराज देशमुख, रामकिशन रणधीर देशमुख यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिक गणेश कुंभार, अभिजीत साळुंके यांनी घटनेची माहिती कळवताच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी तातडीने घटना स्थळी भेट दिली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून त्यांच्या विनंतीवरून तहसीलदार यांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह गणेश कुंभार, अभिजीत साळुंके, अभिजित पतंगे, सूरज राजे, नागोराव साळुंके, मंदार देशपांडे, मनपाचे  अमजद शेख, मनोहर शिंदे, तहसील कार्यालयाचे प्रवीण कस्तुरे व परिसरातील नागरिक यांनी उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा राबविण्यात पुढाकार घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR