लातूर : प्रतिनिधी
वादळी वा-याने लातूर शहर व परिसरात थैमान घातले होते. या वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी लहान-मोठी झाडं उनमळून पडली. त्यासोबतच केबलही तुटून रस्त्यावर पडले. काही ठिकाणी आजही केबल वायर लोंबकाळत आहेत. बहुतांश ठिकाणी केबल वायर रस्त्यावर पडलेले आहेत. या केबल वायरमुळे शहरात विविध ठिकाणी मृत्यूचे सापळे निर्माण झाले असून संबंधीत यंत्रणा अपघात होण्याची वाट पहाते की काय?, अशी परिस्थिती आहे.
लातूर शहरामध्ये रस्ते खोदणे, केबल टाकणे, पाईप लाईन टाकणे, झाडं तोडणे, अवैधरित्या फलक लावणे, अवैध बांधकाम करणे, नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्किंग करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे यासह शहर विद्रुप करण्याचे काम सातत्याने होत असताना शहरातील मातृ संस्था असलेल्या लातूर शहर महानगरपालिकेला थांगपत्ता लागत नाही, हे विशेष.
शहरातील विजेच्या खांबांवरुन विविध ठिकाणी केबल टाकण्यात आलेले आहे. गेल्या महिन्यात लातूर शहरात वादळी वा-याने थैमान घातले होते. या वादळात अनेक लहान-मोठी झाडं उनमळून पडली होती. त्यासोबतच केबलचे जाळेही विस्कटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात केबलचे खुप मोठे जाळे पसरलेले आहे. उड्डान पुलाच्या दुतर्फा विजेच्या खांबावरुन केबल टाकलेले आहेत. काही वर्षांपुर्वी उड्डानपुलावरील विजेच्या खांबावरील केबल एस. टी. बसला अडकुन विजेचे खांब पडले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली होती.
शहरातील गरुड चौक, विवेकानंद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजर्षी छत्रपती शाहु महाराज चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक, एक नंबर चौक, पीव्हीआर चौक, शासकीय कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय, औसा रोड, अंबाजोगाई रोड यासह शहरातील अंतर्गत भागांतही केबलचे जाळे पसरलेले आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर केबल तुटून पडलेले आहे. काही ठिकाणी केबल लोंबकळतही आहेत.