मुंबई : प्रतिनिधी
शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला सर्वांना दिला आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले. तरुणांवर लाठीचार्ज करण्याची काय गरज होती?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशातील लोकशाही संपवणारे पंतप्रधान ठरतील अशी सुद्धा सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काल दिल्लीमध्ये तरुण पोरांवर लाठीचार्ज करत त्यांना जखमी करण्यात आले. ज्या पद्धतीने पोलिस गुंडगिरीसारखे वागत होते. जंतर मंतर हे लोकशाहीच्या हक्काचे एक स्थान आहे, जिथून आंदोलने होत असतात. वांगचुक यांना उचलून नेणे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे यामुळे देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे जाणवत आहे. मोदी सरकार आंदोलनाला का घाबरते आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. ते टाळायला पाहिजे होते. पण यामुळे आता तरुणांचा उद्रेक थांबणार नाही.
उद्योगांसाठी सुपीक जमिनी बळकावू नका
विजय वडेट्टीवार म्हणाले की, कुठलाही उद्योग-व्यवसाय करत असताना त्यासाठी सुपीक जमीन घेऊच नये. देशामध्ये सर्वच उद्योग दीर्घ काळ चालले असे नाहीत काही उद्योग बंद पडतात. त्यासाठी अनेक कारणं आहेत. उद्योगांना जमिनी घेण्यास कोणाचा विरोध नाही. पण सुपीक जमिनी घेण्याचा आग्रह का केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सरकार आग्रह करत आहे. गडचिरोलीमध्ये शेतक-यांनी आंदोलन केले की सुपीक जमिनी देणार नाही. तुम्ही उद्योजकांना पायघड्या घाला पण त्यासाठी शेतक-यांचे नुकसान करू नका. आमचा उद्योगांना विरोध नाही पण सुपीक जमिनी घेण्यास विरोध आहे. जर तसे झाले तर आम्ही शेतक-यांच्या बाजूने उभे राहू, जबरदस्तीने जमिनी घेता येणार नाहीत.
पुण्यात २ हजार कोटींचा टीडीआर घोटाळा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, एफएसआयमध्ये प्रचंड मोठे घोटाळे झाले आहेत. टीडीआर घोटाळा असे अनेक घोटाळे झाले आहेत. सरकार याबद्दल चौकशी करत नाही, आम्ही अनेक वेळा विधिमंडळात याबद्दल मागणी केली आहे. पुण्यात २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला पण त्यावर काहीच कारवाई केली जात नाही. पुण्यात डंपिंग ग्राऊंडमध्ये ज्या लोकांचा बळी गेला त्यामधील दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. सरकारने घोटाळे करणा-यांची चौकशी करत कारवाई केली पाहिजे.















