युद्धविराम आवश्यक, अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र
अहिल्यानगर : प्रतिनिधी
जगाचे लक्ष सध्या अमिरेका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाकडे लागले असून युद्धाविराम कधी होईल, याचीच वाट सर्वजण पाहात आहेत. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर होत असून हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. भारतानेही युद्ध थांबवण्याची गरज व्यक्त केली. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून युद्धजन्य परिस्थितीत भारताने शांततेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.
जगातील वेगवेगळ््या देशात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केलीे. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. भारताची संस्कृती अहिंसा आणि शांततेची असून भारताने जगासमोर संवाद आणि शांततेचा मार्ग पुढे करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
यु्द्धाच्या पार्श्वभूमीवर अलीकडील घटनांमध्ये निरपराध महिला, मुले आणि कुटुंबांवर होत असलेल्या परिणामांच्या बातम्या अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहेत. युद्ध आणि संघर्षाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांनाच बसतो, ही बाब लक्षात घेऊन जागतिक स्तरावर भारताकडून शांततेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राकडून मानवता आणि शांततेचा संदेश जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
संवादातून स्थैर्याचा
मार्ग निघत असतो
युद्धामुळे विनाश होतो, तर संवादातूनच स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निघतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

