Homeलातूरशाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलावी

शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलावी

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी ११ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत पॅट परीक्षेसह ९वी व ११वीच्या परीक्षांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्यावतीने शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शाळांची पत्यक्ष पडताळणी ११ ते २२ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. याच कालावधीत पॅट परीक्षा ११, १५ व २२ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून, त्या दिवशी ९वी व ११वी च्या विशिष्ट विषयांच्या परीक्षांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरील कालावधीत शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर दुहेरी जबाबदारी येत आहे. एकीकडे परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी असताना दुसरीकडे प्रत्यक्ष पडताळणीसाठी उपस्थित राहणे कठीण ठरणार आहे. शाळांच्या नियमित शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक शाळांनी ९ वी व ११वी च्या इतर परीक्षेचे वेळापत्रकही निश्­चित केले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अतिरिक्त तासांचे नियोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष पडताळणीमुळे शिक्षकांवर अनावश्यक ताण येणार आहे.
सध्या परिस्थितीत बहुतांश माहिती डिजिटल स्वरुपात उपलब्ध असल्याने प्रत्यक्ष पडताळणीऐवजी ऑनलाइन पडताळणीचा पर्याय परिणामकारक ठरु शकतो. त्यामुळे सदर प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया पुढे ढकलून ती पुढील शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात यावी किंवा पर्यायी स्वरुपात डिजिटल पध्दतीचा अवलंब करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली  आहे. निवेदनावर सचिव प्राचार्य बाबूराव जाधव, सरचिटणीस प्रा. गोविंद घार, कोषाध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे, सहसचिव पी. एन. बंडगर, उपाध्यक्ष जे. जी. सगरे, बी. जी. चोले, एम. एस. पात्रे, एस. व्ही. परगे, के. एस. क्षीरसागर, कालिदास माने आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR