लातूर : प्रतिनिधी
आपले लातूर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयीन परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, लघुशंका करू नये, असे आवाहन महापौर जयश्रीताई सोनकांबळे,आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी केले आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी नागरिक लघुशंका करतात. घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी आणून टाकला जातो.अशा ठिकाणी कचरा साठल्यामुळे परिसर अस्वच्छ होऊन दुर्गंधी, डासांची वाढ, संसर्गजन्य आजारांचा प्रसार होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे शहरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे नागरिकांनी लघुशंकेसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा. सार्वजनिक आरोग्यास बाधा आणणारी कृती टाळावी. शाळांच्या परिसरात कचरा साठवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या घरातील ओला व सुका कच-याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून मनपाला सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणी, शैक्षणिक संस्था तसेच शासकीय मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. स्वच्छ व निरोगी परिसर हा सुदृढ आयोगाचा पाया आहे. आपल्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही महापौर सोनकांबळे व आयुक्त कुलकर्णी यांनी केले आहे.
















