मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट वापरावे असे ठरविण्यास राज्य सरकारने गेल्या आठवड्यात मान्यता दिली. मात्र, या शासकीय निर्णयाला ओबीसी नेते आणि समाजाकडून मोठा विरोध होत आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. पण आता ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तर या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. पण भुजबळांच्या या भूमिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पाठिंबा दिला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी या सोशल मीडिया साइटवर आरक्षणासंदर्भातील एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसींचे नुकसान होणार असून शासनाच्या या निर्णयाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील शासन निर्णयास छगन भुजबळ साहेब जो विरोध करीत आहे तो योग्यच आहे, असे स्पष्टपणे देशमुखांनी सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमधून पात्र या शब्दाबाबत सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. ‘पात्र’ शब्दाला मनोज जरांगेंनी विरोध केल्याने तो शब्द काढून टाकण्यात आला. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणे सोपे होणार आहे, असेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शासननिर्णयामुळे ओबीसींचे नुकसान : अनिल देशमुख
भुजबळ यांचा आरक्षणासंदर्भात अभ्यास आहे. ओबीसी समाजाच्या हितासाठी ते गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहेत. यामुळे राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील शासन निर्णयास छगन भुजबळ जो विरोध करीत आहे तो योग्यच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आमचा विरोध नाही. ओबीसी समाजाला मुळातच आरक्षण २७ टक्के आहे. त्यात १३ टक्के भटके विमुक्त व इतरसाठी राखीव आहे. उरलेल्या १९ टक्क्यात जर मराठा समाजाला सरकारने शासननिर्णय काढल्याप्रमाणे आरक्षण दिले तर ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे प्रचंड नुकसान होणार आहे.
















