आग्रा : वृत्तसंस्था
मुघल बादशाह शाहजहानचा ३७१ वा उर्स (वाढदिवस) सोहळा सुरू झाला आहे. ताजमहालमध्ये एएसआयचे अधिकारी तळघरात २२ फूट खाली उतरले. शाहजहान-मुमताजच्या ख-या कबरी उघडण्यात आल्या. यानंतर गुसल विधीने (कबरींवर चंदनाचा लेप) उर्सला सुरुवात झाली. येथेच, शाहजहान आणि मुमताजच्या ख-या कबरी आहेत, ज्या मुख्य घुमटाखालील तळघरात आहेत.
हा तळघर बनावट कबरींच्या खाली आहे, त्याचा मार्गही बनावट कबरींच्या समोरून बनवलेल्या पाय-यांनी खाली जातो, जो जाळीने झाकलेला असतो. येथे कोणीही जाऊ शकत नाही. उर्सच्या वेळी ही जाळी उघडण्यात आली, अंधारात २१ पाय-या उतरल्यानंतर तळघरात समोर शाहजहान-मुमताजच्या ख-या कबरी दिसल्या.
पर्यटकांसाठी हे तळघर बंद असते, कोणीही येथे येऊ-जाऊ शकत नाही. वेंटिलेशनचीही येथे कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे येथे खूप दमटपणा असतो. संगमरवरी भिंतींच्या मधोमध असलेल्या या तळघरात फक्त शाहजहान-मुमताजच्या ख-या कबरी आहेत, मुमताजच्या कबरीवर कोणतीही सजावट नाही, तर शाहजहानच्या कबरीवर सजावट केली आहे, रंगीबेरंगी मोत्यांनी जडलेली शाहजहानची कबर मुमताजच्या कबरीपेक्षा उंचीमध्ये ०.१२ मीटर मोठी आहे.

