34.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूर‘शाहू पॅटर्न’चे जनक हरवले

‘शाहू पॅटर्न’चे जनक हरवले

लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व राज्यात ‘शाहू पॅटर्न’ निर्माण करणारे राज्यसभाचे माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने एक  शैक्षणिक, सामाजिक चळवळ, साहित्यिक क्षेत्राबरोबरच राजर्षी शाहू पॅटर्नचे जनक आज हरवले आहेत, अशी भावना राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली.
डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपल्या कार्यकाळात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे माजी कुलगुरू, तसेच लातूर शहरचे थेट नगराध्यक्ष म्हणून कार्य केले. हे करीत असताना समाज जीवनात मोलाची भूमिका बजावली. शिक्षण, समाजप्रबोधन आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली. विचारांची समृद्ध परंपरा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हीच त्यांची खरी ओळख होती. देशमुख परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. वाघमारे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी
माजी खासदार, माजी कुलगुरू, लातूरचे माजी नगराध्यक्ष आणि थोर विचारवंत डॉ. जे. एम. वाघमारे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद असून, त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी डॉ. वाघमारे सरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सरांनी प्रदीर्घ काळ सेवा बजावली. त्यांच्याच कार्यकाळात ‘लातूरचा आदर्श शैक्षणिक पॅटर्न’ आकाराला आला, ज्यामुळे त्यांना या पॅटर्नचे जनक मानले जाते. ‘शिक्षण केवळ चार भिंतींच्या आत मर्यादित नसते’, या धारणेतून त्यांनी व्याख्याने आणि प्रबोधनाच्या माध्यमातून अनेक प्रगल्भ पिढ्या घडवल्या. सामाजिक, शैक्षणिक कार्याच्या निमित्ताने तात्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख  व इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळी सोबत त्यांचे अत्यंत स्रेहाचे संबंध होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उत्तुंग कार्य लक्षात घेऊन नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांची निवड झाली, या विद्यापीठाला सर्वदृष्टीने आकार देण्याचे कार्य डॉ. जे. एम. वाघमारे यांनी केले यातून, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे.
भारतीय संसदेचे सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी कार्य केले, त्या ठिकाणीही त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेतून वेगळा ठसा निर्माण केलेला आहे, लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्यही दीर्घकालीन लक्षात राहील असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. जे. एम. वाघमारे आज आपल्यातून निघून गेले असले तरी, त्यांचे कार्य आणि विचार कायम स्मरणीय आणि प्रेरणादायी राहणार आहेत, अशा शब्दात डॉ. जे. एम. वाघमारे  यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आदराजली अर्पण करुन आपण वाघमारे परीवाराच्या दु:खात सहभागी असून परीवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी केली आहे.
प्रयोगशील कामातून राजकारणाला दिशा दिली
डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत कणखर होते. साहित्य, समाज, शिक्षण, राजकारण आणि पुरोगामी चळवळीत ते सक्रिय सहभागी असत. लेखन, वाचन आणि भाषणातून घटनात्मक मूल्यांची सातत्याने मांडणी करत परिवर्तनवादी विचार दिला. ते पाच दशकांहून अधिक काळ प्रयोगशील कामातून शिक्षण, राजकारणाला दिशा दिली. नांदेडच्यास्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून अनेक प्रयोग केले.ते अनेकांचे मार्गदर्शक व आधारवड होते. त्यांच्या जाण्याने साहित्य, समाज, शिक्षण,राजकारण आणि पुरोगामी चळवळीवर शोककळा पसरली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मानवी मूल्यांचा जागर घालणारे ज्येष्ठ सामाजिक विचारवंत होते, अशा शब्दात मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य डॉ. जयद्रथ जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ध्येयवादी विचारवंत हारपला
आजची सकाळी एक दु:खद बातमी प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे सरांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा अत्यंत वाईट वाटले. कारण लातूरच्या शैक्षणिक, वैचारिक चळवळीचे नेत्रुत्व हे समर्थपणे प्रा.डॉ.वाघमारे सरांनी समर्थपणे केलं मुद्देसुद मांडणी व परिवर्तनवादी विचारांची बांधिलकी हा सरांचा वैचारिक वारसा होता. डॉ. म. ना. वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतल्या निग्रो साही त्यात सरांनी पिएचडी केली.गोर्याअमिरिकेने निग्रो वर चारशे वर्ष गुलामी लादली तर भारताने अडीच हजार वर्ष अस्पृश्यता लादली यांचा तुलनात्मक दांडगा अभ्यास सरांनी मांडला.ते एक ध्येयवादी विचारवंत होते लातूरच्या वैचारिक चळवळीचे खर्या अर्थाने नायक तर होतेच पण महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीचे ते नायक होते.आशा या थोर विचारनायकांस माझी भावपुर्ण श्रध्दांजली.
-केशव कांबळे.
साहित्य निर्माता हरपला
प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे यांनी मराठी भाषेत मौलिक असे वैचारिक साहित्य लिहून मराठी साहित्याची वैचारिक उंची वाढवली. दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी आणि साहित्य चिंतन हे त्यांचे दोन ग्रंथ म्हणजे मराठी वैचारिक साहित्य प्रकारातील मापदंड ठरतात.आदरणीय सरांनी मराठी भाषा साहित्य विषयक वैचारिक उंची वाढवली त्यांची विपुल ग्रंथसंपदा हीच पुढील साहित्य चळवळीस मार्गदर्शक ठरू शकेल. साने गुरुजींची भारतीय संस्कृती या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन जळगाव विद्यापीठात त्यांच्या शुभहस्ते झाले हाच त्यांच्या हस्ते मला मिळालेला मोठा पुरस्कार. त्यांच्या साहित्य ऋणात राहणे यातच साहित्य समाजाचे भले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– प्रा. डॉ. सुरेखा बनकर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR