औसा : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण अभियानांतर्गत औसा तालुक्यातील शिंदाळावाडी येथे विवाह सोहळ्यातून अनोखी सुरुवात करण्यात आली. शिंदाळावाडी येथील अजय वामन मोरे व आशिव येथील पूजा आशिष गोरे यांच्या शुभविवाह सोहळ्यात ७ जुलै २०२६ रोजी नववधू-वरांना आशीर्वाद देतानाच लोकशाहीचेही संस्कार देण्यात आले. औसा तालुक्याचे तहसीलदार घनश्याम अडसूळ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव खिचडे यांच्या हस्ते नवविवाहित दाम्पत्यांना मतदाराचे अद्ययावत फॉर्म प्रदान करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक कर्तव्य आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने विशेष सखोल पुनरिक्षण अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. मुख्याध्यापक महादेव खिचडे म्हणाले की, ‘विवाह हा दोन जीवांच्या नव्या आयुष्याचा प्रारंभ असतो. त्याच शुभक्षणी लोकशाहीप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या प्रसंगी शिंदाळावाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन वामन मोरे, बीएलओ शिक्षक रंगनाथ कांबळे, सरपंच राजाभाऊ चव्हाण, पोलिस पाटील प्रदीप गरड, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निळकंठ सरतापे, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण गरड, ग्रामसेवक भिमसिंग चव्हाण, सौदागर गरड, अच्युत कांबळे तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
















