27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेंची मोठी ऑफर; ४ नगरसेवक गळाला

शिंदेंची मोठी ऑफर; ४ नगरसेवक गळाला

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, मुंबईतील ठाकरे गटाचे दोन प्रमुख शिलेदार माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. विशेष बाब म्हणजे, हे नेते १८ जून रोजी ‘मातोश्री’ येथे पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे बैठक संपल्यानंतर लगेचच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच शिंदे गटाने ठाकरेंना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा वर्धापनदिन सोहळा आज संपन्न होत आहे. विधानसभेत शिंदेसेनेने घवघवीत यश मिळवत ५७ जागांवर यश मिळवले. तर ठाकरेसेनेला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेले दोन्ही गटांचे मेळावे महत्त्वाचे आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनालाच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे, अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक माजी नगरसेवक नादिया मोहसीन शेख देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे मुंबईतले राजकारण वेगळे वळण घेत आहे.

शिंदे नपुंसक राजकारणी : विनायक राऊत
शिंदे गटाचे काही दलाल आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याचा एक अधिकारी आहे. निमेश रेवडेकर असे त्याचे नाव आहे. हा ब-याच नगरसेवकांच्या घरी जातो. त्यांच्या घरच्या मंडळींना फोन करतो. तुमच्या आयुष्याचे साहेब भले करणार आहेत, असे सांगतो, असा आरोप त्यांनी केला. तर शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. त्यांना स्वत:च्या पक्षातला स्वत:चा कार्यकर्ता निर्माण करण्याची हिंमत नाही, असा हल्लाबोल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

शिंदेसेनेच्या ‘रात्रीस खेळ चाले’ने जागरण
पालिका निवडणूक कधीही लागण्याची शक्यता असल्याने मेळाव्यांमधून सेनेचे दोन्ही गट मुंबईत शक्तिप्रदर्शन करत आहेत. पण त्याआधी ठाकरेसेनेला धक्के देण्यासाठी शिंदेसेनेकडून हरत-हेचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंच्या पक्षातील अस्वस्थांना गळाला लावण्याचे प्रयत्न शिंदेसेनेकडून सुरू आहेत. त्यासाठी गेल्या २० दिवसांपासून अक्षरश: रात्रीचा दिवस सुरू आहे. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेला ८४ जागांवर यश मिळाले होते. पुढे हा आकडा १०० च्या आसपास पोहोचला. शिवसेनेतील फुटीनंतर यातील निम्मे नगरसेवक शिंदेसेनेत गेले. त्यामुळे ठाकरेंची मुंबईतील ताकद कमी झाली आहे. ठाकरेंचे वर्चस्व आणखी कमी करण्यासाठी शिंदेसेनेने ताकद लावली आहे.

आई ठाकरे बंधूंना एकत्र आण
एकविरा देवीला साकडे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनानिमित्ताने ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिका-यांनी मिळून खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीला महाआरती करून साकड घालण्यात आले. महाराष्ट्रात वाढलेला भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सर्वसामान्य नागरिकांची देखील मागणी आहे यासाठी देवीला प्रार्थना करण्यात आली, यावेळी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा देण्यात आल्या तसेच दोन्ही पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR