मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सध्या कोल्ड वॉर सुरू आहे. भाजपाकडून शिंदे गटाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी फोडण्याचे काम सुरू आहे. पण आता लवकरच शिंदेंचे ३५ आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि काही स्थानिक प्रमुख नेते आता भाजपाने आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे शिंदे गटामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याविरोधात मंगळवारी (ता. १८ नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सुद्धा शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार घालत आपली नाराजी व्यक्त केली. तर यानंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून भाजपा नेते अमित शहांना तक्रार केली. पण याचा फारसा फायदा झाल्याचे पाहायला मिळत नाही. अशातच आता शिंदे गटातील किमान ३५ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’ या वृत्तपत्रातून केला आहे.
ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाने खळबळजनक दावा करत म्हटले आहे की, पुढील विधानसभेला भाजपा शिंदेंशिवाय निवडणुका लढणार हे नक्की. भाजपाने एक ‘पक्ष’ निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपानेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान ३५ आमदार भाजपामध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे. भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ करून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली. त्या फुटीचे सूत्रधार हेच शिंदे होते. आता दुस-या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटावरच घाव घालणे सुरू आहे. शिंदे यांचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत. अमित शहा यांनी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाच्या संगनमताने शिंदे यांना शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह दिले. शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे. शिंदे हे ठेकेदार सेना चालवतात. त्यामुळे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तसे शिंदे यांना लोक चिकटलेले आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
तसेच, भाजपाच्या रवींद्र चव्हाणांनी शिंदेंसमोर मोठी गुळाची ढेप ठेवली. शिंदे यांचे मुंगळे हे
भाजपाच्या ढेपेवर चढले. शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपाला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे. ‘रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसे फोडली’ या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरले नाही. जे शिंदे स्वत:च फुटले, त्यांनी माणसे फोडण्यावर चिंता व्यक्त करावी, हा मोठाच विनोद आहे. महाराष्ट्रात सत्तापक्षांतील ‘नाराजी’ नाट्य सुरूच राहील. या ‘नाराजी’ नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे. नाराज शिंदे यांना भाजपा कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही. ‘नाराजी’चे महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे!, असा दावाही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या या दाव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेतेमंडळींकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

