16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या पक्षातूनच मतचोरीचा आरोप; यादीत २.९८ लाख संशयास्पद मतदार!

शिंदेंच्या पक्षातूनच मतचोरीचा आरोप; यादीत २.९८ लाख संशयास्पद मतदार!

नाशिक : देशभर मतचोरीचा मुद्दा गाजत आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले. भाजपकडून प्रत्युत्तरादाखल मूक मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादी आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. देशाच्या विविध भागात यावर राजकारण तापले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कायदा सेलने नाशिकला केलेल्या तक्रारीने भाजप तोंडावर पडला आहे.

नाशिकमध्ये मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कायदा आघाडीचे हर्षल केंगे व त्यांच्या सहका-यांनी यावर गंभीर शोध घेतला. त्यानंतर या नेत्यांनी मतदार यादीवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. दुबार आणि बोगस मतदारांची नावे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे मतदार यादी संशयास्पद असल्याची त्यांची तक्रार आहे.
यासंदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कायदा सेलने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातील नावे विशिष्ट मतदारसंघात नोंदविणे. मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे दोन ठिकाणी समाविष्ट करणे. असे विविध आक्षेप निवेदनात आहेत.

या मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शहरातील चार विधानसभा मतदारसंघात दोन लाख ९८ हजार संशयास्पद आणि दुबार नावे असल्याची सप्रमाण तक्रार त्यांनी केली आहे. यामध्ये देवळाली मतदारसंघात ८६ हजार तर नाशिक पश्चिम मतदारसंघात ९३ हजार ५१७ संशयास्पद नावे असल्याची तक्रार आहे.
शहरातील मतदारसंघाच्या यादीत समाविष्ट बोगस आणि संशयास्पद नावे तातडीने वगळावीत या संदर्भात मतदार याद्यांचे पुनरावलोकन करावे. संबंधित त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या वेळी निवडणूक आयोगाच्या कामकाज पद्धतीचे वाभाडे काढण्यात आले. मतदार यादीतील अनेक घोटाळे पुराव्यासह उघड केले. त्यामुळे हा मोर्चा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरला.
ठाकरे बंधूंच्या या मोर्चाने भाजप अस्वस्थ झाल्याचे स्पष्ट दिसले. या मोर्चाला उत्तर म्हणून मुंबईत मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात संबंधित आरोप फेटाळण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR