नशिक: प्रतिनिधी
येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला आहे. युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे सादर करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्ष नेतृत्वाने निवडणूक प्रक्रियेत स्थानिक पदाधिका-यांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केला, तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणा-यांकडे दुर्लक्ष करून ऐनवेळी पक्ष प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजीतून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्थानिक पातळीवर काम करणा-या इच्छुकांना तिकीट न देता बाहेरून आलेल्यांना प्राधान्य देणे, तसेच काही वरिष्ठ नेत्यांनी स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोपही शहरातील पदाधिका-यांनी केला. आम्ही दोन वर्षांपासून पक्ष उभारत आहोत, मात्र आमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करून आमच्या मतांची तमा न बाळगता निर्णय घेतले गेले, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिका-यांनी जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला आहे. नव्या पक्षात सामील झालेल्या इच्छुकांना उमेदवारी देखील देण्यात आल्याची माहिती मिळते.

