मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून असलेली ठाकरेंच्या नेतृत्वातील सत्ता उलथवून लावण्यास भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला यश आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार, हे निश्चित झाले असले तरी भाजप की शिंदे गट यांपैकी कोणाचा महापौर होणार? हे अद्यापही निश्चित झालेले नाही.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकांचा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे. त्यामुळे आता, कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून असलेली ठाकरेंच्या नेतृत्वातील सत्ता उलथवून लावण्यास भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला यश आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार, हे निश्चित झाले असले तरी भाजप की शिंदे गट यांपैकी कोणाचा महापौर होणार? हे अद्यापही निश्चित झालेले नाही. त्याचमुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे. महापौर हे शोभेचे पद आहे, पण शिवसेना शिंदे गटाला खरे तर स्थायी समिती पद स्वत:कडे हवे असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. २० जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापौरपदावरून रंगलेल्या राजकारणाबाबत म्हटले की, जर एखादा उमेदवार एखाद्या पक्षाच्या नावावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर त्यांना पुढील पाच वर्षे त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून काम करणे गरजेचे असते. जर, त्याला पक्षांतर करायचे असेल तर त्यांना आधीच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. पण शिंदेंच्या बाबतीत किंवा भाजपच्याबाबतीत तसे दिसत नाही.
ते दुस-या पक्षातून निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, विकत घेतले जातात. यालाच प्रतारणा म्हणतात. हा मतदारांचा विश्वासघात आहे. भ्रष्ट पैशांच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणे आणि समोरच्या लोकांना पैशांच्या बळावर माघार घ्यायला लावणे आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणे याला सुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात, त्यामुळे याविषयी सत्ताधा-यांनी अधिक खोल जाऊन अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला राऊतांकडून देण्यात आला आहे.
तसेच, भाजप महापौरपदावरून दावा सोडणारही नाही. पण, अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरे पदरात पाडून घेता येईल का? याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यांना स्थायी समितीत अधिक रस आहे, असे म्हणत राऊत म्हणाले की, महापौरांना फार अधिकार नाहीत, ते शोभेचे पद आहे. मुंबईचे किंवा आपल्याकडील अन्य शहरांचे महापौरपद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये ज्या पद्धतीने महापौरांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, त्याप्रमाणे नाहीत. तिथले महापौर हे निर्णय घेणारे असतात, त्यांना तसे अधिकार असतात, पण आपल्या येथील महापौरांना तसे अधिकार नाहीत. त्यामुळे स्थायी समिती जिथे पैशांचे, ठेकेदारीचे, टेंडरचे घोटाळे केले जातात, त्यामध्ये यांना रस असल्याचे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सत्ताधा-यांना टोला लगावला आहे. त्यामुळे आता त्यांच्या टीकेला भाजप किंवा शिवसेना शिंदे गटातील नेतेमंडळी नेमके काय उत्तर देणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

