अहिल्यानगर : प्रतिनिधी
शिंदेसाहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षाचे संपर्कप्रमुखपद तुमच्याकडेच ठेवा, असे खडेबोल शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहेत. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी ४ महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान विश्वासात न घेतल्याने पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे नाराज होते. त्यातच मेंगाळ यांनी पक्षप्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप बाजीराव दराडे यांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचला होता.
९ ऑगस्ट रोजी मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मारुती मेंगाळ यांनी ‘एकतर दराडे यांना पक्षात ठेवा किंवा आम्हाला तरी ठेवा’, अशी मागणी भर मंचावर एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ‘कार्यकर्त्यांना कुणापासूनही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे. शिवसेना पक्ष मालक आणि नोकराचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाजीराव दराडे यांना पक्षातून बाजूला करण्याचे संकेत दिले होते. एकनाथ शिंदे यांच्या इशा-यानंतर बाजीराव दराडे यांनी २४ तासांच्या आत स्वत:हून आपला राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला आहे.
मी पक्ष म्हणून उदयास आलो नाही तर संघर्षातून पुढे आलो आहे, अशा शब्दांत बाजीराव दराडे यांनी एकनाथ शिंदे यांनाच खडेबोल सुनावले आहेत. सत्तेत असल्याने शिवसेना शिंदे गटात आजतागायत अनेक पक्षप्रवेश झाले आहेत आणि होत आहेत. मात्र आता अनेक ठिकाणी जुने आणि नवे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने आगामी काळात शिंदे सेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता दिसत आहे.

