मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप आघाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही दिवसांपासून राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यानंतर आता ‘ड’ वर्गाच्या महानगरपालिकांवर आयएएस सनदी अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील १९ ड वर्गाच्या महानगरपालिका आहेत. या महापालिकांची लोकसंख्या मिळून साडेचार लाखांपेक्षा अधिक असून जवळपास ९०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प या महापालिकांमधून हाताळला जातो. याआधी अ, ब आणि क वर्गातील महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याची पद्धत होती. परंतु ‘ड’ वर्गात हा नियम लागू नव्हता. आता त्याचाही समावेश करण्यात आल्याने स्थानिक सत्ताधारी गटांचा प्रभाव कमी होणार असल्याची भीती शिंदे गटातील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाशी संबंधित काही अधिकारी अलीकडेच ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. त्यामुळे शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही नाराजीचा सूर
एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे नाट्य केवळ सरकारपुरते मर्यादित नसून त्यांच्या शिवसेनेतही उघडपणे दिसू लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने विभागप्रमुखांची नेमणूक केली. मात्र या नियुक्त्यांवरून पक्षात मोठे नाराजीचे वादळ उठले आहे. पश्चिम उपनगरांमध्ये अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्याने तणाव निर्माण झाला. तर आता दक्षिण मुंबईतही ही नाराजी उफाळून आली आहे. विशेषत: शिवडी विधानसभा क्षेत्रातील विभागप्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोले यांची नियुक्ती झाल्याने स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. पाच शाखांपैकी चार शाखाप्रमुखांसह अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
नाना अंबोले यांच्या नियुक्तीला विरोध
एकीकडे शिंदे-फडणवीसांचे नाराजी नाट्य सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटातही अंतर्गत नाराजीचा सूर सुरू झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विभागप्रमुखांची नेमणूक केल्याने पक्षातील इतर इच्छुकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. पश्चिम उपनगर विभागप्रमुखांच्या नियुक्तीवरून दक्षिण मुंबईतही आता उघड उघड विभागप्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे. शिवडी विधानसभेच्या विभागप्रमुखपदी माजी नगरसेवक अंबोलेंच्या नियुक्तीवरून पदाधिका-यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
पक्षाचे नेतृत्व आणि प्रतिष्ठा
मुंबई महापालिका निवडणुका शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कारण या निवडणुका त्यांच्या राजकीय ताकदीची खरी कसोटी ठरणार आहेत. मात्र अशा निर्णायक टप्प्यावर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याने एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे फडणवीसांशी वाढलेली नाराजी, तर दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नियुक्त्यांवरून कार्यकर्त्यांचा असंतोष, या दुहेरी संकटामुळे शिंदे गटाची स्थिती डळमळीत होऊ शकते. येत्या काळात हे मतभेद मिटवण्यास शिंदे किती सक्षम ठरतात, यावर त्यांचे नेतृत्व आणि पक्षाची प्रतिष्ठा अवलंबून राहणार आहे.
















