27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस यांच्यात दुरावा?; राजकीय वर्तुळात चर्चा

शिंदे-फडणवीस यांच्यात दुरावा?; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्याज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते. शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसून आलेल्या दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत भाष्य केले आहे.

तुम्हीच प्रश्न विचारता आणि हे सगळं घडवून आणता. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा सत्कार होता आणि त्या दोन खुर्च्या त्यांच्यासाठी होत्या. ते सत्कारमूर्ती होते. एका बाजूला मुख्यमंत्री होते आणि दुस-या बाजूला मी होतो. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज आणि टीआरपीसाठी अशा मनगढण गोष्टी चालवल्या जातात, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेवर स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, रावण कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अहंकार कुणाला आहे हेही सर्वांना माहिती आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला पटत नाही आणि ते जमत नाही. ती मळमळ, जळजळ ते नेहमीच व्यक्त करतात. घरात बसून लोकांच्या समस्या सोडवता येत नाहीत. उंटावरून शेळ्या हाकणे याला म्हणतात. मी मुख्यमंत्री झाल्यापासून हे सर्व उबाठाचे लोक बाहेर आहेत. कारण त्यांना सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री झालेल्याचं बघवत नाही. गर्व आणि अहंकार यामुळे रावणाची लंका ही जळून जाते. माझ्यावर आरोप करणा-यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेतील नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर महायुतीत वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र यांची तक्रार केल्याचेही सांगण्यात येत आहे. आता महायुतीतील वाद संपलेला आहे, असे सांगितले जात आहे. परंतु हा वाद अजूनही मिटलेला नाही. शिंदे यांचा दिल्ली दौरा झाल्यानंतर शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) मुंबईतील हुतात्मा चौकात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. परंतु यावेळी त्यांची देहबोली मात्र काहीशी वेगळी दिसल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जातेय. शिंदे आणि फडणवीस यांची देहबोली बदललेली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते.

हुतात्मा चौकातील कार्यक्रमात सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. अभिवादनानंतर शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठ करून उभे राहिले. दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचे बोलले जात आहे. याच प्रसंगाचे काही व्हीडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामुळेच महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR