लातूर : प्रतिनिधी
शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. शिक्षकांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा असतात. शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करणे हे समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी केले.
एज्युकॉन पुरस्काराने केंद्रे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आल्याबद्दल येथील संगमेश्वर विद्यामंदिरच्यावतीने राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे व अध्यक्ष के. ए. जायेभाये यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, उपप्राचार्या कविता केंद्रे, समन्वयक अश्विनी केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, समन्वयक वैशाली केंद्रे, राजीव मुंढे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजेंद्र जायेभाये, विष्णू कराड, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य केंद्रे म्हणाले, शिक्षक केवळ अभ्यासक्रम शिकवणारे नसून, ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारे शिल्पकार असतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणात्मात शिक्षण न देता सुसंस्कार, राष्ट्रप्रेम व सामाजिक मूल्यांची शिकवण द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

