जळकोट : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील शिक्षकांची कोंडी झाली आहे. सक्तीची असलेली सीटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीस आहे. ८ फेब्रुवारीलाही काही शिक्षकांची परीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षकांसाठी पात्रता निश्चीत केली. त्यानुसार ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे, त्यांनादेखील दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावे लागेल. पात्रता पूर्ण न केल्यास सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची पदोन्नतीही ‘टीईटी’ उत्तीर्ण असेल तरच दिली जाणार आहे. शिक्षकांनाही वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ‘टीईटी’ बंधनकारक आहे.
जळकोट तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लागली आहे . एकट्या जळकोट तालुक्यात जवळपास ४०० शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लागली आहे. जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास ८००० च्या वर शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी लागली आहे. यामधील ब-याच शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. परीक्षा व मतदान एकाच दिवशी आले आहे. यामुळे अनेक शिक्षकांना परीक्षेस मुकावे लागण्याची शक्यता आहे.

