शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिक्षण हेच व्यक्ती, समाज आणि देशाच्या प्रगतीचे खरे साधन आहे. शिक्षणाशिवाय विकासाची कल्पनाच करता येत नाही, त्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे असून प्राथमिक शिक्षकांनी लहान मुलांना शिक्षणांबरोबर नैतिक शिक्षण सुद्धा देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी केले.
शिरूर अनंतपाळ येथील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांच्या जीवन गौरव सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर, खा. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. विक्रम काळे, उद्योजक विवेक देशपांडे, जेष्ठ नेते अॅड. संभाजीराव पाटील, नगराध्यक्षा चंद्रकलाताई शिवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे म्हणाले की ‘‘गुरुजींनी आयुष्यभर शिक्षणाची साधना केली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जीवनमूल्यांचे संस्कार दिले. सहा भाषांवर प्रभुत्व मिळवून त्यांनी शिक्षक म्हणून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल.’’त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांच्या चाहत्यांनी जीवन गौरव सोहळ्यातून उत्तराई होण्याचे काम केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रभाकर कुलकर्णी गुरुजींना सन्मानचिन्ह, फेटा, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ‘‘असा एक प्रभाकर.’’ या गुरूजीवरील संपादित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सहकारी व विद्यार्थी यांचा सहवास मला चांगले काम करण्यास नेहमी ऊर्जा दिली. सुसंस्कृत माणसं घडविण्यासाठी मला नेहमी प्रोत्साहित केले. आजचा झालेला माझा सन्मान जीवनातील महत्वाचा क्षण असल्याचे सांगत सत्काराला उत्तर देताना गुरुजी अक्षरश: गहिवरले होते.
जिवन गोरव सोहळ्या मध्ये गुरूजी यांना देण्यात आलेल्या सन्मान पत्राचे वाचन साहित्यीक धनंजय गुडसुरकर यांनी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी येरोळे यांनी केले. सुत्रसंचलन इंजि. किरण कोरे यांनी तर आभार अनंत अचवले यांनी मानले. यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर,शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

