मुंबई : प्रतिनिधी
राज्यात एकीकडे महायुती सरकारकडून हजारो कोटींच्या योजना आणि विकासाच्या मोठमोठ्या जाहिरातींचा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना रोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे. यावर टीका करताना, आता पोकळ घोषणा नकोत, तर सरकारने आपले उत्तरदायित्व सिद्ध करावे, असा इशाराही काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. गोटाटोला गावातील हे ११ लहान विद्यार्थी शिक्षणाची भूक भागवण्यासाठी रोज जीव मुठीत धरून घनदाट जंगलातून पायी प्रवास करतात. या मार्गावर हिंस्त्र प्राण्यांचा, विशेषत: वाघांचा मोठा धोका आहे. तरीही भविष्याच्या आशेवर ही मुले रोज हा जीवघेणा प्रवास करत आहेत. या भीषण वास्तवावर बोट ठेवत वडेट्टीवारांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सरकारच्या धोरणांवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, सरकार सध्या विकासाच्या जाहिरातींमध्ये मश्गूल आहे. हजारो कोटींच्या योजना, मोठमोठ्या घोषणा आणि चमकदार प्रचारासाठी सरकारकडे भरपूर पैसा आहे; पण आदिवासी भागातील या लेकरांना सुरक्षित शाळा आणि वाहनाची व्यवस्था करण्यासाठी सरकारकडे साधी इच्छाशक्तीही उरलेली नाही. ही केवळ बेपर्वाई नाही, तर दुर्गम भागातील मुलांच्या आयुष्याशी खेळण्याची सरकारची निर्लज्ज वृत्ती आहे.
विशेष कृति आराखड्याची मागणी
वडेट्टीवारांनी राज्य सरकारकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. गोटाटोला गावातील या विद्यार्थ्यांसाठी सरकारने तातडीने कायमस्वरूपी आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी त्यांची पहिली मागणी आहे. तसेच, संपूर्ण राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील शिक्षणासाठी सरकारने तातडीने एक विशेष कृति आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
















