लातूर : प्रतिनिधी
मागील तीन-चार महिन्यापासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अत्यंत अपमानास्पदरित्या झालेल्या अटकेचा संघटनेच्या वतीन शिक्षण सेवेतीले सर्व अधिका-यांनी निषेध नोंदवला. या निषेधार्थ जिल्हयातील शिक्षण सेवेतील अधिका-यांनी एक दिवसीय सामूहीक रजा आंदोलन करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी यांच्यावतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणी ज्यांनी बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा केला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी संघटनेची मागणी आहे. तथापि सदर प्रकरणात ‘चोर सोडून संन्याश्याला ‘फाशी’ या म्हणी प्रमाणे विनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातील अधिका-यांमध्ये दहशत व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागातील अधिकारी प्रचंड ताण तणावाखाली काम करत आहेत. शिक्षण विभागातील अधिका-यांचे कुटुंबीय सुध्दा समाजात अपमानास्पद रित्या जीवन जगत आहे. महाराष्ट्र शिक्षण सेवेतील अधिकारी हे राजपत्रित अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाचे काम नियमानुसारं व प्रामाणिकपणे करत असतात. ते गुन्हेगार नसून कदाचित काम करत असतांना काही त्रुटी, चुका होऊ शकतात. त्याकरीता विभागांतर्गत चौकशीची व कारवाईची व्यवस्था कार्ररत आहे. अधिका-यांच्या कामात अनियमितता आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे शास्तीची तरतूद आहे. तथापि छोटया छोटया प्रशासकीय कारणांवरून शिक्षण विभागातील अधिकारी यांचे शासनाची परवानगी नसतांना विना चौकशी अमानवीय पध्दतीने अटकसत्र सुरु आहे.
या बाबींचा निषेध म्हणून व जोपर्यंत शिक्षण विभागातील अधिका-यांना विभागाच्या परवानगी शिवाय विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी शासनाकडून मिळत नाही तोपर्यंत राज्यातील शिक्षण सेवेतील सर्व अधिकारी दि. १ ऑगस्ट रोजी सर्व अधिका-यांनी एक दिवसीय सामूहीक रजा आंदोलन केले.
या आंदोलनात सहाय्यक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले, शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, डी, एस. लांडगे, बी. के. हाशमी, गटशिक्षणाधिकारी सी. आर. शेख, कृष्णा भराडिया, वेतन पथक अधिक्षक मदन हगवणे, लातूर बार्डाच्या विभागीय सचिव अनुपमा भंडारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशोक कदम, अधिक्षक रामलिंग काळे, राजेंद्र ढाकणे आदी सहभागी झाले होते.

