पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर ठार करण्यात आले आहे. सहा वर्षीय या बिबट्याने शिरूर लातुक्यातील काही गावांमध्ये हैदोस घालून ठेवला होता.
मंगळवारी (ता. ४ नोव्हेंबर) रात्री उशिरा शार्प शूटरने कारवाई करत या अंदाजे सहा वर्षीय बिबट्याला ठार केले आहे. या बिबट्याने आतापर्यंत दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला होता. ज्यानंतर संतप्त नागरिकांच्या मागणीमुळे या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते. पण मंगळवारी शार्प शूटरने बिबट्याला ठार केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या शिवन्या बोंबे (वय वर्षे ५) मृत्यू झाला होता. त्यानंतर, २२ ऑक्टोबर रोजी भागाबाई रंगनाथ जाधव (वय वर्षे ७०, मौजे जांबुत, ता. शिरूर) या वृद्ध महिलेचा याच बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी (ता. १ नोव्हेंबरला) रोहन विलास बोंबे या १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले होते. सातत्याने नागरिकांवर होणा-या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती.















