शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
खरीप हंगामाची सुरुवात होऊनही तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतक-यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील सुमारे ५५ टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नसून, पावसाअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे. आकाशात ढगांची ये-जा होत असली तरी दमदार पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांच्या आशा मावळू लागल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामात मुख्यत: सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस आणि इतर पिकांची लागवड केली जाते. जून अखेरपासून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्ण होणे अपेक्षित असते मात्र यंदा पावसाचा लांबलेला खंड आणि अत्यल्प पर्जन्यमानामुळे अनेक शेतक-यांनी पेरणीच केलेली नाही. काही शेतक-यांनी धाडस करून पेरणी केली असली तरी पावसाअभावी बियाणे उगवण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अनेक शेतक-यांनी बियाणे, खते आणि औषधांची खरेदी कर्ज काढून किंवा उसनवारी करून केली आहे मात्र पाऊस नसल्याने ही सर्व तयारी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेत पेरणी झाली नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते. त्यामुळे शेतक-यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची चन्हिे आहेत. खरीप हंगामावरच बहुतांश शेतक-यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. शेतीतील उत्पन्नातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, शेतीची पुढील मशागत, कर्जाचे हप्ते आणि इतर खर्च भागविले जातात. त्यामुळे पेरणी लांबल्यास किंवा खरीप हंगाम अपयशी ठरल्यास त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
सध्या शेतकरी दिवसातून अनेकदा आकाशाकडे नजर लावून बसला आहे. हवामान बदलत असले तरी दमदार पावसाचा पत्ता नाही. शेतात नांगरणी करून तयार ठेवलेली जमीन पावसाच्या प्रतीक्षेत कोरडी पडली आहे. अनेक गावांमध्ये शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आता काही दिवसांत चांगला पाऊस झाला तरच खरीप हंगाम वाचेल, अशी भावना व्यक्त होत आहे. कृषी तज्ज्ञाच्या मते, आगामी काही दिवसांत व्यापक आणि सलग पाऊस झाला तर उर्वरित क्षेत्रावर पेरणी पूर्ण होऊ शकते मात्र पाऊस आणखी लांबल्यास पिकांच्या निवडीमध्ये बदल करावा लागू शकतो. काही शेतक-यांना कमी कालावधीत येणा-या पिकांकडे वळण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.















