शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
यंदाच्या दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असले, तरी शिरूर अनंतपाळ तालुक्यात तूर्त चा-याची स्थिती नियंत्रणात आहे. खरीप पिकांच्या अवशेषांतून उपलब्ध होणारा चारा सुमारे तीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र, चा-याचे दर प्रतिकिलो १६ ते १८ रुपये असल्याने पशुपालकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
तालुक्यातील २१ व्या पशुगणनेनुसार ७ हजार १३१ गायी, ९ हजार २९९ म्हशी, ५ हजार ३९३ शेळ्या आणि २ हजार १५३ मेंढ्या असे एकूण २३ हजार ९७६ पशुधन आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या पशुधनासाठी चा-याची उपलब्धता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. चाराटंचाई उद्भवू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून निकृष्ट चारा सकस करण्याचा प्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पशुपालकांना प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. सध्या तालुक्यात चारा तस्करीचे प्रकार घडल्याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. तूर्त चारा उपलब्ध असला, तरी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आगामी काळात चा-याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. चा-याचे वाढते दर आणि पशुधनाच्या संगोपनाचा खर्च यामुळे पशुपालकांसमोरील आर्थिक आव्हान कायम आहे.
















