शिरूर अनंतपाळ :
परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याने दैनंदिन कामकाजाच्या मूल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मागील महिन्यात पंधराव्या क्रमांकावरून थेट तिस-या क्रमांकावर झेप घेतल्यानंतर, यंदाच्या महिन्यात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते परि. पोलिस उपअधीक्षक अक्षय जाधव यांचा सत्कार करण्यात आला. दैनंदिन कामकाजातील विविध बाबींची प्रभावी अंमलबजावणी, अधिकारी व कर्मचा-यांचा समन्वय आणि बीट अंमलदारांची कार्यतत्परता यामुळे पोलिस ठाण्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा झाली. पंधराव्या क्रमांकावरून तिसरा आणि त्यानंतर थेट जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने पोलिस ठाण्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
















