शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरात स्व. गुंडाबाई शंकरप्पा भातांब्रे यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त उदयगिरी लॉन्स नेत्र रुग्णालय, उदगीर व साई क्रिटिकेअर हॉस्पिटल, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटन साकोळ जिल्हापरिषद गटाचे नवनर्विाचित सदस्य माणिकराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास तज्ज्ञ डॉ. रामप्रसाद लखोटीया, डॉ. शीतल पेद्यावाड, डॉ. सुरज लवटे, डॉ. अरविंद भातांब्रे आणि साई क्रिटिकेअर हॉस्पिटल, निलंगा यांच्या सहकार्याने अनेक गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार मिळाले.
या शिबिरात ७० रुग्णांनी डोळ्याची तपासणी करून घेतली, त्यात ५७ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. डॉ. अरविंद भातांब्रे यांनी मधुमेह प्रतिबंध आणि नियंत्रण याविषयी नागरिकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले, जे भविष्यात निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे ही डॉ.भातांब्रे यांनी सांगितले. यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. भातांब्रे, चक्रधर शेळके, बालाजी येरोळे, उमाकांत शिंदाळकर, काशिनाथ बोडके, आसिफ उजेडे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच शिबीरार्थी उपस्थित होते.

