शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरातील श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीने जिल्हा साहित्य संमेलन घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता गुणांकनानुसार प्रस्ताव मंजूर झालेला असून मान्यतेचे पत्र मिळालेले आहे. साहित्य संमेलन घेण्यासाठी शासनाचा पाच लाखांचा निधी मंजूर झाला असून वाचनालयाच्या बँक खात्यात ७५ टक्के रक्कम जमा झालेली आहे.
सदरील साहित्य संमेलन चांगल्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी वाचनालयाचे पदाधिकारी संचालक मंडळ कामाला लागले आहेत. वाचनालयाचे अध्यक्ष एल. बी आवळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येऊन साहित्य संमेलन घेण्यासाठी उपस्थित सर्व सभासदांनी आपली मते मांडली. लातूर जिल्ह्यातून आपल्या वाचनालयास साहित्य संमेलन मिळालेले आहे तर हे संमेलन चांगल्या पद्धतीने यशस्वी करु असे उपस्थित सर्व सभासदांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी शिक्षणतज्ञ प्रभाकरराव कुलकर्णी, माजी जि. प.उपाध्यक्ष अॅड संभाजीराव पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. मन्मथ भातांब्रे वाचनालयाचे चिटणीस डॉ. राजकुमार बोपलकर, उमाकांत शिंदाळकर, संजय उडदे, उपाध्यक्षा सौ. सुनिता देवसटवार, श्रीमती सरोजा राजपूत यांनी विचार मांडले.
साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथदिंडी, उदघाटन, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, युवक व महिला मेळावा, स्मरणिका प्रकाशन, दिव्यांग व्यक्तीबद्दल धोरण, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम घेण्याचे निश्चीत करण्यात आले. एक दर्जेदार स्मरणिका काढण्यासाठी लातूर जिल्हा व शेजारच्या जिल्ह्यातून विचारवंत, साहित्यीकाचे विविध विषयावरील लेख मागवून घ्यावे असे ठरले. या संमेलनसाठी साहित्य संस्कृती मंडळ शिरूर अनंतपाळ, मराठावाडा विकास परिषद शिरूर अनंतपाळ, शहरातील सर्व शाळा, महावद्यिालय, साहित्यीक, नगरपंचायत, तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध संस्थेचे पदाधिकारी,व तालुक्यातील सर्व वाचनालय यांच्या सहकार्याने हे संमेलन यशस्वी करण्याचे या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निश्चीत करण्यात आले. उपस्थित सभासदाचे आभार वाचनालयाचे चिटणीस डॉ. राजकुमार बोपलकर यांनी मानले.

