लातूर : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरूवारी साजरी होणा-या जयंतीनिमित्त युवकांमध्ये उत्साह संचारला असून, शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यास सुरवात झाली आहे. शहरातील विविध संघटनांसह तरुणांनीही विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.
शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत भगवे ध्वज, टोप्यांसह विविध प्रकारचे टॅटू, लहान व मोठया आकाराचे ध्वज, मोटारसायकल व चारचाकी वाहनांना लावण्यासाठी लहान आकाराचे भगवे ध्वज, शर्टला लावण्यासाठी बॅच, महाराजांचा फोटो असलेले स्टीकर, गळयातील मफलर आदी वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात शिव जयंतीचा उत्साह अधिक दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील विविध मंडळांच्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्सहात मिरवणूक काढण्यात येणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरासह तालुक्यात शिवजयंतीच्या तयारीला वेग आला आहे.
गुरूवारी शिवजयंती साजरी होणार असून, बाजारपेठेत भगवे झेंडे, पताका व इतर साहित्यांची रेलचेल असून, सोबतच शिवाजी महाराजांचा पुतळे खरेदीसाठीही गर्दी होत आहे. बाजारपेठेसह शहरातील चौकाचौकात शिव जयंतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्याठीकानावून मोठ्या प्रमाणात तरून वर्ग खरेदी करत आहे. तसेच शिवाजी महाराज यांच्ी प्रतिमा असलेल्या झेंड्यांना अधिक मागणी होत आहे. शिवजयंती मिरवणुकीस सहभागी होण्यासाठी शिवाजी महाराज, शहाजीराजे, जिजाऊ, बालशिवाजी, मावळे यांच्या वेशभूषा खरेदीसाठी ड्रेपरी व्यावसायिकांकडे बुकिंग करण्यास सुरूवात झाली आहे.

