नाशिक : प्रतिनिधी
शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेत नाशिक जिल्ह्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने प्रशासन आणि विभागीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही शिवभोजन केंद्रांमध्ये एकाच लाभार्थ्याचे छायाचित्र दोन ते तीन वेळा वापरून शासनाकडून अनुदान लाटल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ खरोखर गरजूंपर्यंत पोहोचतो आहे की नाही? याबाबत शंका निर्माण झाली आहे.
छायाचित्र व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश
या तक्रारींची गंभीर दखल जिल्हा पुरवठा विभागाने घेतली असून, सर्व केंद्रचालकांना मागील तीन महिन्यांची लाभार्थ्यांची छायाचित्रे व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक शहर व परिसरातील अनेक केंद्रांबाबत तक्रारी वाढू लागल्या असून, या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सात महिन्यांपासून थकित अनुदानाची माहितीही समोर
दरम्यान, जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रचालकांचे सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान गेल्या सात महिन्यांपासून शासनाकडे थकित आहे. हे अनुदान तातडीने मिळावे, यासाठी केंद्रचालकांनी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. यासंदर्भात अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व थकित अनुदान वितरित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रचालकांना देण्यात आले आहे.
बीडमध्येही शिवभोजन थाळी योजनेत भ्रष्टाचार
दरम्यान, बीड जिल्ह्यातील शिवभोजन थाळी योजनेच्या नावाखाली एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारकडून गरजू नागरिकांसाठी चालवली जाणारी शिवभोजन थाळी योजना ही कमी दरात जेवण देण्याचा उपक्रम आहे. मात्र, याच योजनेचा गैरवापर करत अनुदान मिळवण्यासाठी फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. बीडमधील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या उडपी हॉटेलमध्ये एकाच थाळीसमोर जवळपास ५० जणांना बसवून फोटो काढण्यात आले. या फोटोंचा उपयोग करून अधिक थाळ्यांची नोंद करून सरकारकडून अधिक अनुदान मिळवण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत आहे. या प्रकरणाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

