मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील नेरूळ परिसरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुन्हा एकदा कपडा घालण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. जवळपास सहा महिन्यांपासून महानगरपालिकेने या पुतळ्याचे अधिकृत अनावरण केले नव्हते. मात्र, मनसे नेते अमित ठाकरे यांनी १७ नोव्हेंबर रोजी अचनाकपणे पुतळ्याचे अनावरण करत महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मनसेकडून मात्र या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पालिकेवर थेट हल्ला चढवत, छत्रपतींना पुन्हा बंदिस्त करून पालिकेने हे सरकार मोगलाई कारभार करत असल्याचे सिद्ध केले, असा आरोप केला. त्यांनी पुढील काळात गनिमी कावा पद्धतीने पुन्हा एकदा अनावरण करण्याचा इशाराही दिला. मनसेच्या भूमिकेनुसार, महाराजांचा पुतळा जनसामान्यांसाठी खुला ठेवला गेला पाहिजे. सरकारी कारणे, परवानग्या किंवा निवडणूक आचारसंहिता हा यासाठी अडथळा ठरू नये, अशी त्यांची मागणी आहे.
महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाचा : अमित ठाकरे
अमित ठाकरे यांनीही सरकारवर कठोर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, विधिवत आरती करून पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर काही तासांतच पुन्हा घाणेरड्या कापडाने पुतळा झाकण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाचा आहे. तो अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. गरज पडली तर हा कपडा आम्ही पुन्हा काढू, असेही ते म्हणाले. तसेच, त्यांच्या राजकीय आयुष्यातील पहिला गुन्हा छत्रपतींच्या सन्मानासाठी लागल्याचा त्यांना अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
दैवताचा सन्मान केला नाही तर कोणाचा करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल
या प्रकरणावर शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी सरकारी भूमिकेवर ताशेरे ओढत म्हटले की, महाराष्ट्रात स्वत:च्या दैवताचा सन्मान केला नाही तर कोणाचा करणार? चार महिने पुतळा घाणेरड्या कपड्याने झाकून ठेवला आणि मनसेने तो कपडा काढला तर उलट त्यांच्यावर गुन्हा दाखल करता? ही दादागिरी महाराष्ट्र मान्य करणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगाकडेही या निर्णयाची दखल घेण्याची मागणी केली.
पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष
या सर्व घडामोडींना पार्श्वभूमी आहे ती महापालिकेने अनावरण न करण्याची घेतलेली भूमिका. राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ बसविलेला हा पुतळा चार ते सहा महिन्यांपासून झाकूनच ठेवला होता. अधिकृत परवानगी, राजकीय परिस्थिती आणि निवडणूक आचारसंहितेचे कारण देत पालिकेने अनावरणाला विलंब केला. मात्र, या विलंबावर मनसे भडकली आणि अमित ठाकरे यांनी अचानक अनावरण करत या निर्णयाला आव्हान दिले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सध्या पुतळा पुन्हा बंदिस्त असून पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

