24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन

मुंबई : गेल्या काही दशकांत पहिल्यांदाच मुंबईत उबाठाचा महापौर बसणार नाही, हा एक धक्का असतानाच उबाठाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व राखणा-या ठाकरेंना यंदाच्या महापालिका निवडणुकीत केवळ ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या राजकीय धक्क्यानंतर शुक्रवारी काही तासांतच ठाकरेंसाठी आणखीन एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली, ती नीला देसाई गेल्याची. शिवसेनेच्या पहिल्या आमदार नीला देसाई यांचे निकालाच्या काही वेळानंतरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून नीला देसाई यांची ओळख होती. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचार मिळण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांची उपस्थिती अत्यंत मर्यादित होती, त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना संधी दिली होती.

१९९० मध्ये त्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. पुढे त्यांनी विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली. नीला देसाई यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२ वाजता अन्त्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR