मंत्री शिरसाट-सत्तार यांच्यात अबोला
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पक्षसंघटना मजबूत व्हावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून प्रयत्न केले जात आहेत. पुढचे तीन वर्षे मोठ्या निवडणुका नसल्याने आता पक्षाने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या दृष्टीने एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यांनी महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे नेते संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात नाराजी पाहायला मिळाली.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीत शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे चित्र बघायला मिळाले. शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि सध्याचे विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्यात अबोला कायम असल्याचे बैठकीत बघायला मिळाले. पालकमंत्री संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर बाकी आमदारांनी त्यांच्यासोबत हस्तांदोलन केले. मात्र अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांनी हस्तांदोलन करणे टाळले. विशेष म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट आल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार हे खुर्चीवरून उठलेही नाहीत आणि हस्तांदोलनही टाळले. दोघांच्या अबोल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

