पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बोपोडी या दोन्ही भूखंड घोटळ्याची मास्टरमाईंड शीतल तेजवानी असल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीवर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांना तिचा मोबाईल फोन बंद मिळत असून दोन दिवसांपासून पोलिस तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नाही. बावधन पोलिसांना संशय आहे की, शीतल तेजवानी नव-यासह परदेशात पळून गेली असावी.
पुण्यात जमीन घोटाळ्याची एकानंतर एक प्रकरणे समोर येत आहेत. कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहारानंतर बोपोडी येथील जमीन व्यवहारही वादाच्या भोव-यात सापडला आहे. या दोन्ही जमिनींच्या व्यवहारात शीतल तेजवानी या महिलेचे नाव समोर येत आहे. कोरेगाव पार्क येथील तब्बल ४० एकर जमिनीच्या प्रकरणावरून राज्यभरात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन विकत घेतली.
या व्यवहारात मुद्रांक शुल्क रद्द करून घेण्यात आले. बाजार मूल्य १८०० कोटी असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी करण्यात आली आणि त्यावर मुद्रांक शुल्क फक्त ५०० रुपये आकारण्यात आले. या प्रकरणी सहजिल्हा निबंधक वर्ग-१ संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन विक्रेता शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, तसेच सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कुख्यात गुंड निलेश घायवळ फरार झाला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या एकूण कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
















