26.3 C
Latur
Thursday, July 10, 2025
Homeसंपादकीयशुभांशूची अवकाश भरारी!

शुभांशूची अवकाश भरारी!

भारतीय वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी दुपारी १२ वाजून एक मिनिटाने ‘नासा’च्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ऑक्सिऑम-४’ या अंतराळ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. नासाचे ‘फॉल्कन-९’ हे यान अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावले. शुभांशूबरोबर या मोहिमेत आणखी तीन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना झाले आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी यशस्वीरीत्या अवकाशात झेप घेत इतिहास रचला आहे. भारताच्या राकेश शर्मा यांच्या अवकाश प्रवासानंतर ४१ वर्षांनी गु्रप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अवकाशात झेप घेतली. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत, भारतीय वेळेनुसार बुधवारी दुपारी १२ वाजून एक मिनिटाने स्पेस एक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन अंतराळयानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केले. ‘ऑक्सिऑम-४’ मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुभांशू शुक्ला यांनी अवकाशात उड्डाण केले.

यापूर्वी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहिमेवर गेले होते. तब्बल ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावला आहे. शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनौचे रहिवासी असून एक वर्षाच्या प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर त्यांची ‘नासा’ने या मोहिमेसाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ही चौथी खासगी अंतराळवीर मोहीम आहे. अंतराळवीर एका नवीन स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयानातून प्रवास करत आहेत. अंतराळवीर १४ दिवस प्रयोगशाळेत राहणार आहेत. नासाच्या माजी अंतराळवीर आणि ‘ऑक्सिऑम स्पेस’चे मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, पोलंडचे स्लावोझ उइनान्स्की आणि हंगेरीचे टिबर कापू हे अंतराळवीर आहेत. भारत १९८४ नंतर, पोलंड १९७८ नंतर तर हंगेरी १९८० नंतर पुन्हा अवकाशात गेले आहेत.

‘ऑक्सिऑम स्पेस’च्या व्यावसायिक मोहिमेअंतर्गत हे उड्डाण होत आहे. उड्डाणानंतर १० मिनिटांनी अंतराळवीर पृथ्वीभोवतीच्या कक्षेत फिरू लागले. कक्षेत स्थिर झाल्यानंतर अंतराळवीरांनी त्यांच्या अवकाशकुपीचे ‘ग्रेस’ नाव जाहीर केले. शुक्ला यांनी अवकाशात ४१ वर्षांनी भारतीय पुन्हा पोहोचल्याची घोषणा केली. हा प्रवास १.४ अब्ज भारतीयांचा आहे असे ते म्हणाले. अवकाश स्थानकावरील मुक्कामात शुभांशू शुक्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे. पृथ्वीपासून २०० किमी अंतरावरील कक्षेत पोहोचल्यानंतर शुक्ला म्हणाले, मला या क्षणी काहीही म्हणायचे नाही, मी फार आनंदी आहे. आम्ही सेकंदाला ७.५ किमी वेगाने पृथ्वीभोवती कक्षेत फिरत आहोत. माझ्या खांद्यावर असलेला भारताचा तिरंगा मला सांगतो की, तुम्ही एकटे नाहीत, या प्रवासात सर्व भारतीय तुमच्याबरोबर आहेत. ही केवळ माझ्या एकट्याच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील प्रवासाची सुरुवात नसून भारताच्या अवकाश कार्यक्रमाची सुरुवात आहे. देशातील सर्व नागरिकांनी या प्रवासाचा भाग व्हावे, ही माझी इच्छा.

पत्नीसाठी खास संदेश देताना शुक्ला म्हणाले, आयुष्याच्या प्रवासातील माझी अद्भूत भागीदार असलेल्या कामना शुक्लाचे विशेष आभार. तुझ्याशिवाय हे काहीच शक्य नव्हते आणि तू नसतीस तर या कशालाच किंमत नसती. आमच्यापैकी कोणीही एकट्याने अंतराळात प्रवास करत नाही. अनेकांच्या भरवशावर आम्ही हे करू शकतो. मी प्रत्येकाचा आभारी आहे. शुक्ला आणि त्यांचे सहकारी १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. या काळात ते अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतील. ‘इस्रो’ने खास शुक्ला यांच्यासाठी तयार केलेले सात प्रयोग ते करणार आहेत. ज्यामध्ये सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मेथी आणि मुगाला अंकुरित करण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. याशिवाय ते नासाच्या पाच संयुक्त अभ्यासामध्येही सहभागी होतील. ड्रॅगन अंतराळयान सुमारे २८ तासांनंतर गुरुवारी (२६ जून) दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला (आयएसएस) जोडले जाईल. अवकाशयान एका दिवसात पृथ्वीला १६ वेळा प्रदक्षिणा घालेल. शुभांशू १४ दिवस आयएसएसवर राहतील. या काळात ते अंतराळात मानवी आरोग्यावर आणि जीवावर होणारे परिणाम तपासणे यासारखे सात प्रयोग करतील.

दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी डेटा गोळा करतील. शुभांशू यांनी आपल्यासोबत आंब्याचा रस, गाजराचा हलवा आणि मूगडाळीचा हलवा नेला आहे म्हणे. शुक्ला यांचे अंतराळयान अवकाशात झेपावल्यानंतर त्यांच्या आई आशा शुक्ला यांचे डोळे पाणावले. त्यांनी मुलाच्या सुखरूप प्रवासासाठी हात जोडले. ‘ऑक्सिऑम मिशन-४’ वरील शुक्ला यांच्या अनुभवाचा ‘इस्रो’च्या गगनयान मोहिमेला चांगला फायदा होणार आहे. इस्रो ‘ऑक्सिऑम-४’ मोहिमेवर साडेपाचशे कोटी रुपये खर्च करत आहे. अलिकडे भारताने अवकाश क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांद्रयान-३ आणि आदित्य एल-वन मिशनच्या यशानंतर इस्रोने लहानसहान उपग्रह सोडण्यासाठी ‘एसएसएलव्ही-डी-३’ ची तीनदा यशस्वी चाचणी घेतली. या माध्यमातून उपग्रह प्रक्षेपण उद्योगात भारताने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारताचे खरे लक्ष्य गगनयान मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत स्वत:च्या बळावर चार अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. त्यासाठी शुभांशू शुक्लाचा अनुभव लाख मोलाचा ठरणार आहे. शुभांशू शुभ भव!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR