फ्लोरिडा : प्रतिनिधी
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज यशस्वीरीत्या अवकाशात झेप घेत इतिहास रचला आहे. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर, अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत, भारतीय वेळेनुसार आज दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी ऍक्सिओम मिशन ४ (ऍक्स-४) अंतर्गत स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन अंतराळयानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केले.
ऍक्सिओम-४ नावाच्या या मोहिमेत शुभांशू शुक्ला मिशन पायलट म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोज उज्नास्की-विस्रीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी झाले आहेत. ही मोहीम ऍक्सिओम स्पेस या खासगी कंपनीद्वारे आयोजित करण्यात आली आहे, जिचे उद्दिष्ट अंतराळ प्रवास सर्वांसाठी खुला करणे आहे.
आईचे डोळे पाणावले
शुभांशू शुक्ला यांचे अंतराळयान अवकाशात झेपावल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या त्याच्या आई आशा शुक्ला यांचे डोळे पाणावले. त्यांनी मुलाच्या सुखरूप प्रवासासाठी हात जोडले.
१४ दिवसांची वैज्ञानिक मोहीम
शुक्ला आणि त्यांचे सहकारी १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. या काळात ते अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतील. इस्रोने खास शुक्ला यांच्यासाठी तयार केलेले सात प्रयोग ते करणार आहेत, ज्यामध्ये सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मेथी आणि मुगाला अंकुरित करण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. याशिवाय ते नासाच्या पाच संयुक्त अभ्यासांमध्येही सहभागी होतील.
‘गगनयान’ला होणार शुभांशू यांच्या या प्रवासाचा फायदा
अॅक्सिओम मिशन-४ वरील शुक्ला यांच्या अनुभवाचा इस्रोच्या गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेत खूप चांगला उपयोग केला जाईल. इस्रो अक्सिओम-४ मोहिमेवर ५५० कोटी रुपये खर्च करत आहे.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज २५ जून रोजी अॅक्सिओम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकाकडे जाणार आहेत. शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता.