जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात एपीएल केसरी कार्डधारकांना यापुढे रोख रक्कम मिळत आहे आणि ही रोख रक्कम महिला प्रमुखांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होत आहे. जळकोट तालुक्यात ज्या महिला कुटुंब प्रमुखांकडे बँकेचा खाते क्रमांक नसेल किंवा त्यांनी आत्तापर्यंत बँकेमध्ये खाते उघडले नसेल त्यांनी तात्काळ खाते उघडावे तसेच ज्यांनी विहित नमुन्यामध्ये फॉर्म भरलेला नाही अशांनी फॉर्म भरून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार राजेश लांडगे, नायब तहसीलदार अर्पण राऊत, निरीक्षक तांभारे यांनी केले आहे.
अन्न नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या वतीने राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्य सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समावीष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिका धारक शेतक-यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमन २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमा प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य दोन रुपये प्रति किलो गहू व तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता परंतु जानेवारी २०२३ पासून राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमन २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतक-यांना अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी १७० रुपये रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना करण्याकरिता शासन निर्णय पारित झाला आहे .
जळकोट तालुक्यातील शेतकरी लाभासाठी रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमवर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांनी डीबीटीसाठी आवश्यक असलेल्या बँक खात्याचा विहित नमुन्यातील फॉर्म आपल्या गावातील रास्त भाव दुकानदार किंवा तलाठी यांच्याकडून घेऊन सदर फॉर्म भरून अर्जा सोबत, शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत, शिधापत्रिकेतील सदस्यांचे आधार कार्डची छायांकित प्रत , अर्जाला जोडून गावातील रास्त भाव दुकानदार किंवा तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांच्याकडे जमा करावयाचे आहे.
















