मुंबई : प्रतिनिधी
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातील पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही.
शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार शब्द काढत नाही. सरकारने या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतक-याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतक-यांना मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष मे महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे. शेतक-यांचे सर्वकाही पावसाने हिरावून घेतले आहे. पिकं तर गेली आहेतच लाखो हेक्टर जमीनही खरवडून गेली आहे. अशा वेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करण्याची अपेक्षा असते पण आधीचे कृषिमंत्री रमी खेळण्यात व्यस्त होते तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जायला हवे पण त्यांनाही वेळ नाही. शेतक-यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. आता रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी असेही सपकाळ म्हणाले.
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशोक चव्हाण यांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्त्वाची पदे काँग्रेस पक्षाने दिली, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी महत्त्वाची पदे मिळाली, असा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशी भावना पक्ष कार्यकर्त्यांची आहे, असा टोला सपकाळ यांनी लगावला.
















