जालना : आज (८ नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील चारदिवसीय दौ-यातील अखेरच्या दिवशी अजित पवारांवर सडकून प्रहार करत अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या मुलाला सोडून कोणालाच फुकट नको असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाकरे म्हणाले की, शेतकरी हात-पाय हलवतात म्हणून तू जेवत आहेस, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये हडप करण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर सडकून टीका होत आहे. पक्ष चोरल्यानंतर हे सरकार अगोदर मतचोरी करून सत्तेत आले आणि आता जमिनी सुद्धा चोरत असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.
दरम्यान, पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्यवहारावरून विरोधकांकडे सडकून प्रहार होत असताना ठाकरे यांनी सुद्धा टोला लगावला. ते म्हणाले की, सगळेच गुन्हेगार भाजपमध्ये आहेत. मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देतात म्हणून ते क्लीन चिटर झाले आहेत.
म्हणून मी मुख्यमंत्र्यांना गृहकलहमंत्री म्हणत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, पहिल्यांदा मुरलीधर मोहोळ जमीन प्रकरण समोर आल्यानंतर पार्थ पवार प्रकरण समोर आले. आता प्रताप सरनाईक प्रकरण समोर येत आहे, अशा शब्दांत त्यांनी जमिनीच्या व्यवहारावरून हल्लाबोल केला. शेतक-यांना दिलासा देत ते म्हणाले की तुमच्या मनामध्ये ठिणगी आहे ती या सरकारला दाखवून द्या. शेतक-यांची ठिणगी पडली तरी सरकार जळून खाक होईल, असा इशारा त्यांनी दिला.
गावामध्ये बोर्ड लागले पाहिजेत
कर्जमाफीवरून ते म्हणाले की, गावामध्ये बोर्ड लागले पाहिजेत, कर्जमुक्ती नाही तोपर्यंत मत देणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर बोलत आहात ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले. ३१,८०० हजार कोटींच्या पॅकेजवरूनही त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, माझ्यापेक्षा १० पाऊल पुढे जाणारा मुख्यमंत्री असेल तर मी त्याचा जाहीर सत्कार करेन. मात्र, मदत काही मिळालेली नाही.

